सावद्यात प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेचे दहन ( व्हिडीओ )

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे प्रफुल्ल लोढा यांचा येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला. सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश नगराज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लोढा यांचा निषेध केला. तसेच त्यांनी पुन्हा आगळीक केल्यास धडा शिकवण्याचा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला.

राष्ट्रवादीचे कथित पदाधिकारी असणारे प्रफुल्ल लोढा यांनी काल अतिशय खालच्या स्तरावर जात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्याने खळबळ उडाली आहे. लोढा यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या अनुषंगाने येथे आज राष्ट्रवादीतर्फे लोढा यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी लोढांच्या निषेधार्थ व खडसे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राजेश वानखेडे यांनी लोढा यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर लोढांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. त्यांनी हाच प्रकार पुढे केल्यास धडा शिकवण्यात येईल असा इशारा सुध्दा वानखेडे यांनी याप्रसंगी दिला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश नगराज पाटील सावदा येथील नगरसेवक फिरोज खान पठाण, सिद्धार्थ बडगे, सुभद्राबाई बडगे, किशोर बेंडाळे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे , सौ विजया जावळे, सौ रेखा वानखेडे, हरी मामा परदेशी, चारुदत्त वानखेडे यांच्यासह कार्यकर्ते हजर होते

खालील व्हिडीओत पहा या घटनेचा वृत्तांत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/2186319634834552

Protected Content