सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले असून आज पुन्हा एक नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

सावदा येथे आधी दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. यानंतर एक बाधीत हा सावदा येथील आपल्या भावाच्या घरी पळून आला असल्याचे प्रकरण घडले होते. तथापि, हा रूग्ण मुंबई येथील रहिवासी आहे. यानंतर आज पुन्हा एक नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे. हा रूग्ण शहरातील महानुभाव मठाजवळ असणार्या श्रीकृष्ण मंदिर परिसरातील रहिवासी आहे. आज आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा आधीच मृत्यू झालेला असून आज त्यांचा रिपोर्ट आलेला आहे. या रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त आल्यानंतर लागलीच हा परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरात तिसरा पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्याधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात फवारणी करण्यात येत आहे.



