सावदा, ता. रावेर, प्रतिनिधी । येथे संचारबंदी आणि जमावबंदी कायद्याचे तंतोतंत् पालन करून ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली होती त्याच प्रमाणे बुद्ध जयंती सुद्धा घरातच बसून साजरी करण्यात आली.
सावदा शहरातील सर्व बौद्ध बांधव यांनी सकाळी ७ वाजता संचारबंदी आणि जमावबंदी कायद्याचे तंतोतंत् पालन करून नालंदा बुद्धविहार येथे सामूहिक त्रिशरण, पंचशील बुद्धपुजा घेतली. तसेच सर्व बुद्धविहारात मेणबत्ती पेटऊन रोषणाई करण्यात आली. यावेळी गौतम बुद्ध यांचे विचार सांगण्यात आले. ज्यात “अत्त दिप भव” स्वतःच स्वतःचा दिप हो! स्वतःच स्वतःचा प्रकाश हो! जीवनात सुख शांती, समाधान यश प्रतिष्ठा, मान, सन्मान, धन संपत्ती, आरोग्य जे काही हवे आहे. ते स्वतःच तुम्हाला स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने मिळवायचे आहे. दुःखी आहेस, संकटात आहेस, अपयशाने खचला आहेस, चिंताग्रस्त आहेस, भयभीत आहेस, व्यथित आहेस, विवंचनेत आहेस, संभ्रमात आहेस, व्याकूळ आहेस, तर तुला दुसरे बाहेर काढतील व सुखी करतील हे शक्य नाही. जे काही करायचे आहे ते तुला स्वतःलाच करायचे आहे. ज्याचे दुःख त्यालाच दूर करायचे आहे. ज्याचे अपयश त्यालाच यशात रूपांतरित करायचे आहे. जो अशांत आहे. त्यालाच स्वतः प्रयत्न करून शांती मिळवायची आहे. जो निर्धन आहे. त्यालाच योग्य प्रामाणिक प्रयत्न करून सधन व्हायचे आहे, असे विचार सांगण्यात आले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा रावेर तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, युवक बौद्ध पंच ट्रस्ट, अध्यक्ष रमाकांत तायडे , युवक बौद्ध पंच ट्रस्ट सचिव खुशाल निकम , युवराज लोखंडे, टारझन तायडे, गणेश तायडे, अश्वजित सुरवाड़े , अमोल तायडे, बंटी तायडे यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.