सावखेडासिम येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर

यावल, प्रतिनिधी  ।  वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांनी  सामाजिक बांधीलीकी जोपासत किशोरवयीन मुलींसाठी यावल तालुक्यातील सावखेडासिम येथे  मार्गदर्शनपर विशेष शिबिराचे आयोजन करून एक सुत्य असा उपक्रम राबविला. 

किशोरवयीन  ११ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या दरम्यान त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु ,आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर जास्त किंबहुना बोललेच जात नाही. पालक व शिक्षक ही ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसून येत नाही. परिणामी त्यांच्या मनातील प्रश्न व शंकाचे समाधान होत नाही. या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करण्यासाठी डॉ. नसीमा तडवी यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळीविषयी समस्या आदी विषयाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी  मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. तर काही मुलींसोबत त्यांच्या आई (माता) सुद्धा आलेल्या होत्या त्यांनीही मुलींच्या समस्या सांगितल्या. त्यांच्या ही शंका व समस्यांचे निराकरण डॉ. तडवी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व किशोरवयीन मुलींची मोफत रक्त (H.B.) तपासणी करण्यात आली व आवश्यकतेनुसार सर्वांना लोह आणि कॅल्शियमची औषधे मोफत  देण्यात आलेत.  डॉ. तडवी यांच्याकडून किशोरवयीन मुलींसाठी नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल माता व किशोरवयीन मुलींनी डॉ. तडवी यांचे आभार व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्पेश पाटील, माया संदांशिव, आरोग्यसेविका अनिता नेहते, गटप्रवर्तक हेमांगी फेगडे, दिपाली पाटील, दिवाकर सुरवाडे, शिवप्रताप घारू, आशा सेविका शरीफा तडवी, रजिया तडवी व सुवर्णा पाटील आदींचे सहकार्य लाभले.

 

Protected Content