जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढत असतांना ‘सारी’ या रोगाचे सावट देखील दूर झाले नसल्याचे दीक्षितवाडीतील एका रहिवाश्याच्या मृत्यूमुळे दिसून आले आहे.
कोरोनासोबत ‘सिव्हीयर अॅक्युट रेस्पीरेटरी इलनेस’ म्हणजेच ‘सारी’ या व्याधीचाही सध्या प्रकोप सुरू आहे. गत महिन्यात जिल्हा रूग्णालयात याच्या संसर्गाने जवळपास १९ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली होती. मध्यंतरी याचा संसर्ग कमी झाला होता. यानंतर मंगळवारी दीक्षितवाडी परिसरातील रहिवासी असणार्या ६३ वर्षे वयाच्या वृध्दाचा मृत्यू सारीच्या संसर्गाने झाल्याची माहिती जाहीर करण्यात आल्याने याचा प्रादूर्भाव अद्याप थांबला नसल्याचे दिसून आले आहे. या वृध्दाला श्वास घेण्यात अडचण येत असल्याने कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.