मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेत रमजान ईदच्या अनुषंगाने शहरातील मौलाना, मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी अशांची बैठक घेऊन रमजान ईदच्या दिवशी सामूहिकरित्या नामजपठण करू नये असे आवाहन करण्यात आले.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे दि. १७ मे रोजीचे आदेशाची प्रत उपस्थित समाजबांधवांना वितरित करण्यात आली. यावेळी विविध सूचना देण्यात आल्या. यात रमजान ईदच्या दिवशी इदगाह मैदानांवर एकत्र येऊन अथवा सामुदायीकरित्या नमाजपठण करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. मुस्लिम बांधवांनी नमाजपठण ईदगाह मैदानांवर सामूहिकरित्या न करता आपापल्या घरात करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीत उपस्थित बांधवांचे शंका निरसन करुन आदेशाबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.