सामान्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईतील सामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

 

नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 53 रेल्वे स्थानकांवर व  मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये लसीकरण पडताळणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली

 

कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती.  ऑनलाईन अ‍ॅपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अ‍ॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल.

 

रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन चहल यांनी केले आहे.

 

सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक ३५८ मदत कक्ष असतील. मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील. कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत , छायाचित्र ओळखपत्र असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं नसेल, तरी रेल्वे स्थानकावर प्रवेश नाकारण्यात येईल पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.

 

शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार  मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल.

 

कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील.

 

 

Protected Content