जळगाव, प्रतिनिधी । जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांग व्यक्तींना सहायक साहित्य वाटप करणे व उल्लेखनीय/विशेष कार्य करणा-या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, व जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव के. एच. ठोंबरे, जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे उपस्थित होते.
यावेळी ‘स्वयंदीप ‘ संस्थेच्या संस्थापिका मिनाक्षी निकम यांनी दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी व त्यावर दिव्यांगानी केलेली मात याबाबत मनोगत व्यक्त केले. दिव्यांगाना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तसेच इतर कायदेशीर सल्ला हवा असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव के. एच. ठोंबरे यांनी केले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य प्रशासनाकडून करण्यात येईल असे सांगितले. यावेळी मान्यवरांनी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच साहित्यांची पाहणी केली.
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजय परदेशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन तसेच जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्राचे केंद्रप्रमुख गणेशकर आदी उपस्थित होते.