जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील सामरोद-तळेगाव, सामरोद-आमखेडा आदी गावांना जोडणाऱ्या कांग नदीवरील पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू असून मध्येच बंद केले जाते तर कधीतरी सुरू केले जाते. अशी अवस्था या कामाची असून ठेकेदाराचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे.
दोन पावसाळे निघून गेले परिसरातील नागरिक हा पुल पुर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण या पुलामुळे सुमारे २० किलोमीटरचा फेरा परिसरातील नागरिकांचा त्यामुळे वाचणार आहे. बोदवडला जायचे असल्यास फत्तेपूर व फर्दापुरच्या नागरिकांना जामनेरहुन जावे लागते. या रस्त्याने गेल्यास २० ते २५ किलोमीटर अंतर कमी होत असल्याने लोक या रस्त्याचा वापर करतात. माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने या पुलाचे काम सुरु झाले होते मात्र हे काम दोन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून आता तर काम बंदच पडलेले आहे. हे काम कधी सुरू होणार ? तब्बल दोन ते अडीच वर्षे होऊन देखील ठेकेदारांकडून हे काम पूर्ण का होऊ शकले नाही ? याची चौकशी वरिष्ठांनी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.