साकेगावात ‘जय बजरंग संघ’ ठरला सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी

sakegaon cricket

भुसावळ, प्रतिनिधी | ग्रा.पं. साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत’ रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ‘जय बजरंग’ संघाने ‘जय महाराष्ट्र’वर सात गडी राखून विजय संपादन केला. गेल्या सहा वर्षात एकही संघ दोनवेळा ही स्पर्धा जिंकू शकलेला नाही. विजेत्या संघाचा फोटो व चषक सन्मान म्हणून वर्षभर ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात येतो, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

 

अंतिम सामन्यापूर्वी जय बजरंग व जय महाराष्ट्र संघांची ग्रामपंचायत कार्यालयापासून ते मैदानापर्यंत बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र संघाने निर्धारित १० षटकात ६४ धावा केल्या, यात सर्वात जास्त डॉ. दीपक पाटील यांनी २९ धावा काढल्या. प्रत्त्युत्तरात जय बजरंग संघाने हे लक्ष सात गडी राखून गाठले. सात षटकात हर्षल पाटील या खेळाडूने पाच उत्तुंग षटकार टोलवून नाबाद ४८ धावा काढत सहजरीत्या विजय मिळवून दिला व मानाच्या सरपंच चषकावर प्रथमच जय बजरंग संघाने आपले नाव कोरले.

स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय महाराष्ट्राच्या डॉ. दीपक पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय महाराष्ट्राच्या शुभम पाटील व मालिकावीर जय बजरंगच्या हर्षल पाटील यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजय संघ जय बजरंग ला ग्रामपंचायतीतर्फे -२५ हजार, माजी सरपंच आनंद ठाकरे -पाच हजार, आमदार संजय सावकारे -तीन हजार, डॉ. दीपक पाटील -तीन हजार, शांताराम कोळी -दोन हजार, विनोद कोळी- एक हजार,नितीन धांडे पाचशे उपविजेत्या जय महाराष्ट्र संघाला जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे पाच हजार, पप्पू पटेल- पाच हजार, आमदार संजय सावकारे -दोन हजार, विनोद परदेशी -२१०० असे रोख व धनादेशाद्वारे बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक सैय्यद खादिम, सरपंच अनिल पाटील, दिलीपसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे, माजी सरपंच आनंदा ठाकरे ,जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, समाजसेवक नरेंद्र पाटील, सुरेश पाटील, गजानन पाटील, अनिल सोनवाल, प्रवीण पवार, राजेंद्र पाटील, सुधाकर सोनवणे, नाना चव्हाण राहुल चौधरी, विनोद परदेशी रमजान पटेल, राजू भोईटे पप्पू पटेल, डॉक्टर दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास राहुल चौधरी यांच्यातर्फे साडेचार फुटांची ट्रॉफी देण्यात आली, हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. याशिवाय गावातील समाजसेवक नरेंद्र पाटील यांच्यातर्फे विजयी व उपविजयी संघास ट्रॉफी, महर्षी वाल्मिक युवा मंडळातर्फे विजेत्या व उपविजेत्या संघास ट्रॉफी, गणेश मनोरे यांच्यातर्फे विजयी उपविजयी संघास ट्रॉफी, संजय काशिनाथ भोई यांच्यातर्फे विजयी, उपविजयी संघाला ट्रॉफी, अनिल पाथरवट -विजेता संघाला ट्रॉफी, पोलीस पाटील राजू सपकाळे यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज व आयोजन कमिटी यांचा सत्कार, विनोद परदेशी यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज ,फलंदाज, मालिकावीर व समालोचक यांना प्रत्येकी ११०० रुपये, डॉ. कैलास ठाकरे यांच्यातर्फे स्पर्धेतील संपूर्ण सामनावीरांना ट्रॉफी देण्यात आली. सुधाकर सोनवणे यांच्यातर्फे मालिकावीराला एक हजार, विलास ठोके यांच्यातर्फे समालोचक यांना गौरविण्यात आले.

यंदाचा विजयी संघ ‘जय बजरंग’ची डीजेच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच विजयी चषकासह वर्षभर ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा फोटो लावण्यात येणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून राहुल कोळी, शाहरुख शेख, समालोचक म्हणून हाजी रमजान पटेल, गुणलेखक म्हणून राजू भोईटे, तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत, आयोजन कमिटी व सर्व संघाचे खेळाडू यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content