मुंबई : प्रतिनिधी । शिर्डी येथील साई मंदिरातील ड्रेस कोडबाबत वाद निर्माण झाले असतांना आता हिंदू जनजागृती समितीने सर्वच मंदिरांमध्ये वस्त्र संहिता असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानने नुकतेच भाविकांना, भारतीय संस्कृतीनुसार वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे. त्याला तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. या अनुषंगाने हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी निवेदनाद्वारे सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता असावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वस्त्रसंहिता केवळ साई संस्थाननेच नव्हे, तर देशभरातील अनेक मंदिरांमध्ये आहे तसेच गोव्यातील चर्चमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेस-कोड) लागू करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली वस्त्रसंहिता ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित आहे. केवळ मंदिरच नव्हे, विविध क्षेत्रांमध्ये वस्त्रे कोणती घालावीत, याचे काही नियम ठरलेले आहे. त्या ठिकाणी असेच वस्त्र का?, असे कोणी विचारत नाही; मात्र हिंदु देवस्थानांनी असे आवाहन केले की, लगेच अन्याय झाल्याची अभ्यासहीन ओरड केली जाते.
यात पुढे म्हटले आहे की, मंदिरात श्रद्धेने येणारे भक्त आणि धर्मपरंपरा यांचे पालन करणारे भाविक या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत याचे आनंदाने पालन आणि स्वागतच करतील, असा दावाही केला तसेच साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करावी. संस्थानने कोठेही तोकड्या कपड्यांचा उल्लेख केला नाही, पुरुष-महिला असा उल्लेख केला नाही, तरी अनेक दिवस प्रसिद्धी न मिळाल्याने केलेला हा विरोधाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे.