मुंबई: वृत्तसंस्था । आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईमुळं शिवसेना संतापली आहे. ‘ईडी एका पक्षाची राजकीय शाखा असल्याप्रमाणं काम करते आहे. त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. करा कारवाई,’ असं थेट आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.
प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘आमच्या प्रत्येक आमदाराच्या, खासदाराच्या आणि नेत्याच्या घरांसमोर ईडीनं कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही. तुम्ही कितीही नोटिसा पाठवा. कितीही धाडी घाला. खोटी कागदपत्रं तयार करा. पण या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत सत्याचाच विजय होईल,’ असं राऊत म्हणाले.
‘प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी, कंगना राणावत व अन्वय नाईक ही प्रकरणं लावून धरली. त्या आकसातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण आम्ही पर्वा करत नाही. आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. नोटिसा कसल्या पाठवता? घरी या. अटक करायची तर अटक करा. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकलीय. ही नामर्दानगी आहे. भाजपनं सरळ लढावी. शिखंडीसारखं ईडी, सीबीआयचा वापर करून लढत असलात तरी विजय आमचाच होईल,’ असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम असल्यासारखा वागतो. ईडी ही राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय. ज्यांचे आदेश ते पाळताहेत त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे उद्योग आणि धंदे काय आहेत? त्यांना कुठून पैसा येतो? मनी लॉण्ड्रिंग कसं चालतं? निवडणुकीसाठी कसा पैसा येतो? कुठं ठेवला जातो? कसा वाटला जातो? कोणाच्या माध्यमातून वापरला जातो? नामी काय आणि बेनामी काय याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे,’ असंही ते म्हणाले.
‘तपास करण्याची कोणावरही बंदी नाही. पण सरकारशी संबंधित लोकांना, त्यांच्या कुटुंबांना मानसिक त्रास द्यायचा असं ठरवून सुरू असलेले हे उद्योग तुमच्यावर उलटतील. साम, दाम, दंड, भेदामध्ये आम्ही डॉक्टरेट घेतलीय. ते कुणी आम्हाला शिकवू नये,’ असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.