मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारकडून सर्वाच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात आता पर्यंत नीट बाजू मांडण्यात आलेली नाही. २५ जानेवारीला अंतिम सुनावणी आहे. जर सरकारची भूमिका हिच राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.
विनायक मेटे यांनी आज राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. ३ पक्षाचं सरकार एकत्र येत असेल तर मराठा समाजानेही एकत्र यायला हवं. जर आम्ही एकत्र आलो नाही तर समाजाप्रतिचं कोरडं प्रेम दिसून येईल, असं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आम्हाला एकत्र येऊ देत नाही. जे लोक आज बैठकीला येणार नाहीत त्यामागे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही मेटे यांनी दिला आहे. आजच्या बैठकीत कोण आले आणि काय झालं? याबाबत दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्यात येईल, असंही मेटे म्हणाले.