मुंबई प्रतिनिधी । आज मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन न निघाल्याने सरकारने मराठा तरूणांना वार्यावर सोडल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मुंबईत आंदोलनाला बसलेल्या मराठा युवकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली.मार्च -मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रक्रियेला धक्का बसणार नाही, अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तथापि, या बैठकीतून मराठा समाजातील तरुणांना काहीही मिळाले नसल्याची टीका माजी मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात मराठा आरक्षणला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊनच मुंबईतील मराठा आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात कार्यवाही झाली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले. मात्र, या बैठकीत एकही प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. याउलट मराठा तरुणांना वार्यावर सोडण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचं दिसून येतंय. मराठा तरुणांना न्याय देण्याची सरकारची इच्छा नसल्याचा दिसतंय, असेही पाटील यांनी म्हटलं आहे.