दिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन

नवी दिल्ली । आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने गोंधळ उडाला. यात धक्काबुक्कीदेखील झाल्याने सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत चालला होता. त्यानंतर आता दुसरा टप्पा २ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत चालणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या दिवशी दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली.लोकसभेमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेमध्ये बॅनर फडकावले. दरम्यान, भाजपा खासदार रमेश बिधुडी आणि काही अन्य खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात धक्काबुक्की झाली. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर पुन्हा गोंधळास सुरुवात झाली. अखेरीस अखेरीस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Protected Content