पुणे (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी सुरू असताना त्याकडे महाविकासआघाडी सरकार गांभीर्याने पाहत नाही. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्याकडील जबाबदारी काढून ती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात यावी. तसेच ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्याला विरोध करणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडील उपसमितीची जबाबदारी काढून घेण्यात यावी, यासाठी राज्यातील १३ मराठा संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले आहे. मराठा समन्वय समितीची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीला शिवसंग्राम, छावा क्रांतीवीर सेना, छत्रपती युवा सेना, शिवक्रांती युवा सेना, छावा युवा मराठा संघटन, छावा माथाडी संघटना, अखिल भारतीय मराठा युवा परिषद, बळीराजा शेतकरी संघटना,राष्ट्रीय छावा संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मेटे पुढे म्हणाले की, सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असलेले आरक्षण जातेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांना हटवावे. एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून जबाबदारी काढून घ्यावी’, असेही मेटे म्हणाले आहेत.