मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात असला तरी ५ जूनपासून मार्केट कॉम्प्लेक्स, सर्व बाजारपेठ आणि दुकानांना सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही आज आपली नियमावली प्रसिद्ध केलीय.
केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. यानुसार सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील. बीच, सरकारी-खासगी मैदानं, सोसायट्यांचे मैदानं, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल. समूहाने कोणतीच कृती करता येणार नाही. लहान मुलासोबल एका मोठ्या व्यक्तिला राहता येईल. प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरूवात करता येईल. गॅरेजेस सुरू करता येतील. पण गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल. अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.