जळगाव, प्रतिनिधी । शहरातील समता नगर परिसरात राहणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर शनिवारी दुपारी महापौर भारती सोनवणे यांनी त्या ठिकाणी भेट नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करून परिसर सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
समता नगर परिसरात राहणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मनपाची आरोग्य यंत्रणा लागलीच कामाला लागली. महापौर भारती सोनवणे देखील त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नितीन बरडे, ज्योती चव्हाण, प्रशांत नाईक, डॉ.राम रावलानी, डॉ.विजय घोलप, डॉ.संजय पाटील यांच्यासह मलेरिया आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
परिसरात केले सॅनिटायझेशन
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच नगरसेवक नितीन बरडे यांनी तात्काळ मनपाच्या यंत्रणेला बोलावून सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून घेतली. संपूर्ण परिसरात स्प्रिंकलर मशीन आणि हॅन्ड पंपाद्वारे सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून परिसर निर्जंतुक करून घेतला. महापौर भारती सोनवणे यांनी सॅनिटायझेशन प्रक्रियेचा आढावा घेतला.
पोलिसांना बोलावून परिसर सील
समतानगर परिसरात नागरिकांनी घरातच राहावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी आवाहन केले तसेच घाबरून न जाता खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला राहत असलेल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यासाठी महापौरांनी पोलिसांना पाचारण केले.