औरंगाबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सभा होणार आहे. हि सभा होण्यापूर्वीच ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आली असून औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मुंबई, पुणे येथे सभा घेत १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेला आधी परवानगी मिळण्यावरून वाद सुरू झाले होते. तर राज्याच्या गृह मंत्रालयापासून ते औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी परवानगी देऊ नये यासह जमावबंदी लागू करण्याच्या जोरदार चर्चा होत्या.
तर या सभेला परवानगी मिळाल्यानंतर आता पोलिस प्रशासनाने दिलेल्या अटीं शर्तीची अंमलबजावणी करण्यासह जातीय तेढ निर्माण होण्याचा आक्षेप घेत या सभेला विरोध केला जात असून आता या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल झाली आहे.
भीम आर्मी संघटनेकडून या सभेला विरोध असून सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलेला आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून भारतीय संविधानाच्या विरुद्ध जो वागेल, त्याच्याविरुद्ध आहोत. राज ठाकरेंकडून पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाले तर त्याच सभेत महापुरुषांच्या घोषणा ऐकायला मिळतील असे भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे हि सभा होण्याअगोदरच औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाच दाखल करण्यात आली आहे