मुंबई (वृत्तसंस्था) आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे, अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे सांगत नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्यांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे/आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता, त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात. शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे. आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे, अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, राज्यसभेत काही दिवसांपूर्वी भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या होत्य. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यांना समज दिली. यानंतर शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यपाल कोश्यारींनी उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.