सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो — चंद्रकांत पाटील

 

पंढरपूर:  वृत्तसंस्था । सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  केलं आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआयही येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

पंढरपूर येथे चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक  विधान केलं. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआय येणार. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. आम्ही रात्री अथवा दिवसा सत्तांतराची स्वप्ने पाहात नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून रोज रस्त्यावर उतरतो, असं सांगतानाच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असंही ते म्हणाले.

 

यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट केली. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही. पण लॉकडाऊनमुळे गरीबांवर उपासमार येणार आहे. गेलं वर्षभर त्यांचं नुकसान झालं. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास त्यांची उपासमार होईल. त्यामुळे आधी त्यांना पॅकेज द्या, मगच लॉकडाऊन करा, असं पाटील म्हणाले.

 

महाविकास आघाडी एकत्र असली तरी राज्यात काय बोंबाबोंब आहे हे सर्वांना माहीत आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवरचा आहे. 70 लाख लोकांना महाराष्ट्रातील वीजेची जोडणी कट करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यात काही लाख लोक आहेत. पाणी असतानाही विजे अभावी या लोकांना शेतात पाणी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे, असं पाटील म्हणाले. या सर्व प्रश्नावर आण्ही पंढरपूरची पोटनिवडणूक लढवणार आहोत. पाच वर्षात तुमची वीज कापली गेली नाही. पण या सरकारने ते करून दाखवलं आहे. मागचं सरकार आणि या सरकारमधील फरक काय हे लोकांना समजावून सांगणार आहोत, असंही ते म्हणाले. ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त करतानाच लोकांच्या मनातील उद्रेक मताच्या रुपाने बाहेर येईल, असंही ते म्हणाले.

Protected Content