नवी दिल्ली : वृत्तसंस्था । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संसदेच्या कॅन्टीनमधील अन्नपदार्थांचे दर वाढवण्यात आले आहेत. सबसिडी बंद झाल्याने आता संसदेमधील कॅन्टीनमध्ये अधिपेक्षा जास्त पैसे खर्च करुन लोकप्रतिनिधिकांना खाण्याचा आस्वाद घ्यावा लागणार आहे.
२९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या कॅन्टीनमध्ये अन्न पदार्थांवर देण्यात येणारी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता येथील पदार्थांच्या किंमती वाढवण्यात आला आहे. या कॅन्टीनमध्ये आता शाकाहारी थाळी १०० रुपयांना मिळणार आहे. तर नॉन व्हेज बुफे पद्धतीचं जेवण ७०० रुपये प्लेट दराने उपलब्ध होणार आहे. यापूर्वी येथे शाकाहारी थाळी ६० रुपयांना मिळायची.
संसदेच्या कॅन्टीनमध्ये चहा, कॉफीचे दर बदलण्यात आलेले नाही. एक कप चहा पाच रुपयांना तर कॉफी १० रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे लिंबू घालून केलेला काळा चहा १४ रुपयांना मिळणार आहे. या व्यक्तीरिक्त केवळ रोटीचे दर बाहेरील दरांपेक्षा कमी आहेत. येथे एक रोटी तीन रुपयांना मिळते. मात्र इतर गोष्टींचे दर बाहेरील हॉटेल्सप्रमाणेच वाढवण्यात आले आहेत.
आता या कॅन्टीनमध्ये चिकन बिर्याणी १०० रुपयांना मिळणार आहे तर चिकन करीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. साधा डोसा ३० रुपयांना तर मटण बिर्याणी १५० रुपयांना मिळणार आहे. भज्यासाठी आता संसदेच्या कॅन्टीनमध्ये ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी संसदेच्या कॅन्टीनमधील सबसिडी बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. मात्र ही सबसिडी बंद झाल्याने सरकारच्या तिजोरीवरील किती ताण कमी होणार आहे यासंदर्भात बिर्ला यांनी कोणतीच माहिती दिली नाही. सबसिडी बंद झाल्याने लोकसभा सचिवालयाचे वर्षाकाठी आठ कोटी रुपये वाचतील. उत्तर रेल्वेऐवजी आता संसदेच्या कॅन्टीनचे कंत्राट भारतीय पर्यटन विकास निगमला देण्यात येणार असल्याची माहितीही बिर्ला यांनी दिली.