नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपनेत्याच्या द्वेषमूलक मजकुराकडे ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ वृत्तपत्राने प्रसिद्ध झाल्यानंतर देशाच्या राजकारणात प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेसचे खासदार आणि संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या संदर्भात स्थायी समिती ‘फेसबुक’कडे स्पष्टीकरण मागणार आहे, असे सांगितले.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात भाजपचे तेलंगणमधील आमदार टी. राजा सिंह यांच्या अल्पसंख्यांकांविरोधातील कथित िहसात्मक मजकूरप्रकरणी फेसबुकच्या भारतातील धोरण संचालक आँखी दास यांनी दखल घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी मात्र त्याकडे फेसबुकने दुर्लक्ष केल्याचे म्हटले होते. सत्ताधारी पक्षाला दुखावल्यास कंपनीच्या व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होईल, या भीतीपोटी भाजपनेत्यांचा विद्वेषीमजकूर आणि भाषणांकडे दुर्लक्ष केले, असेही ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या रिपोर्टमध्ये म्हटलेले होते. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे मूळ वृत्त ट्वीट करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण ठेवतात. तसेच खोटय़ा बातम्या पसरवून मतदारांवर प्रभाव पाडतात, असा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला. तर एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवेसी यांनी देखील फेसबुकवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. दरम्यान, आता काँग्रेसचे खासदार आणि संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी समिती फेसबुककडे स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.