जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी भागात अंगणात खेळत असलेल्या दोन बालकांच्या अंगावर संरक्षक भिंतीचे गेट कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील गणेश कॉलनी भागात रश्मीकुमार कोल्हे आणि पराग धांडे हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांची मुले मृदूल व पराग हे कोल्हे यांच्या अंगणात खेळत होते. यावेळेस ते संरक्षक भिंतीवर उभे राहिली. याच वेळी या भिंतीचे फाटक त्यांच्या अंगावर पडले. यामुळे तातडीने या दोन्ही बालकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, मृदूल रश्मीकुमार कोल्हे (वय ६) याची प्राणज्योत मालवली. तर परागवर उपचार सुरू आहेत. मृदूल हा कोल्हे दाम्पत्याचा एकुलता मुलगा होता. त्याच्या करूण अंताने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.