हॉटेलच्या स्टोअर रूमला भीषण आग; सव्वा पाच लाखांचे नुकसान

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील राधाकृष्ण हॉटेल व लॉजींगमधील स्टोर रूमला अचानक आग लागून सुमारे ५ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचे टेन्ट हाऊस व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार ३ मे रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात सायंकाळी ५वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बद्रीनारायण मोहनलाल अग्रवाल वय-५८, रा. राधाकृष्ण हॉटेल जवळ, भुसावळ यांचे राधाकृष्ण हॉटेल व लॉजिंग असून हॉटेल चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान शुक्रवारी ३ मे रोजी पहाटे ४ वाजता अचानकपणे त्यांच्या हॉटेलमधील स्टोर रूमला आग लागली. या आगीत स्टोररूम मध्ये ठेवलेले बेडशीट, रुमाल, पिलो कव्हर, आर्टिफिशियल फुले, डेकोरेशनचे कापड, एलईडी लाईट, टेन्ट हाऊसचे साहित्य व डेकोरेशनचे साहित्य असा एकूण ५ लाख २० हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची कोणतीही समोर आलेली नाही. दरम्यान भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणण्यात आली. या संदर्भात सायंकाळी ५ वाजता बद्रीनारायण अग्रवाल यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुमन राठोड ह्या करीत आहे.

Protected Content