जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात संत गरिबदास महाराज बोधदिनानिमित्त विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी रविवारी २६ रोजी शहरातून भाविकांच्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी विविध विषयांचे जनजागृती फलक हाती घेतले होते. तर महिलांसह पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी सर्वप्रथम संत रामपाल महाराज यांचे ऑनलाईन प्रवचन शानबाग सभागृहात झाले. प्रवचनाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानापासून शोभायात्रेला पांढरे झेंडे दाखवून प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेच्या अग्रस्थानी सजवलेल्या वाहनावर संत कबीर आणि संत रामपाल महाराज यांचे भव्य छायाचित्र लावण्यात आले होते. शोभा यात्रेमध्ये संत श्री रामपाल महाराज तसेच परमेश्वराच्या जयजयकार करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या.
यासह देहदान, नेत्रदान, रक्तदान, नशा मुक्त समाज, व्यसनमुक्ती, अध्यात्मिक ज्ञान या विषयांवर माहिती देणारे जनजागृती फलक लक्ष वेधून घेत होते. सुमारे ७०० स्त्री-पुरुष व लहान भाविकांनी शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. शोभायात्रा बहिणाबाई चौधरी उद्यान, रिंग रोड, जिल्हा न्यायालय, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्यवीर चौक, भास्कर मार्केट मार्गे शानबाग सभागृहात विसर्जित झाली.
शोभायात्रेसाठी जिल्हा समन्वयक शिवाजीदास पाटील, गुलाबदास पाटील, सुशीलदास, रमेशदास चव्हाण, विजय परदेशी, जगनदास पवार, आशाताई पाटील, ज्योत्स्ना मिश्रा, गीता पवार आदींनी परिश्रम घेतले.