संजय राऊतांनी घेतली शेतकरी आंदोलकांची भेट

 

नवी दिल्ली । कृषी कायद्यांना परत घेण्याची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांनी आता ६ फेब्रुवारीला देशभरात चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्‍वभूवीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली सीमेवर जाऊन शेतकर्‍यांची भेट घेतली असून शिवसेनेने आंदोलनास पाठींबा दर्शविला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकर्‍यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकर्‍यांची भेट घेतली आहे.

तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकर्‍यांचे मृत्यू नसून या शेतकर्‍यांच्या हत्याच आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी राऊतांनी टिकैत यांना शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्‍वासन दिले.

Protected Content