संचारबंदी : फ़ैजपूर येथे अवैध देशी दारू विकणार्‍या एकाला अटक

फैजपुर, प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असतांना शहरात गेल्या काही दिवसापासून देशी-विदेशी व गुटखाविक्री करणाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातलेला असून तीन ते चार पट जादा किंमतीने त्याची विक्री होत आहे. त्यातच शनिवार दि.४ रोजी पोलिसांनी बाहेर पेठ भागात अवैध देशी दारू विकणार्‍या एकाला अटक करून त्यांच्याकडून दोनशे देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत शनिवार दि.४ रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास बाहेर पेठ भागातील खेमचंद किसन भोई हा त्याच्या घराच्या आडोशाला देशी दारू विकत असल्याची माहिती सपोनि प्रकाश वानखडे यांना मिळाल्यावरून त्यांनी सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, विजय पाचपोळ, हेकॉ इक्बाल सय्यद, उमेश चौधरी यांना या माहितीबद्दल कळविले. त्यावरून त्यांनी बाहेर पेठ भागात छापा टाकून आरोपी खेमचंद किसन भोई याला अवैधरित्या देशी दारू विकत असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ हजार २०० रुपये किंमतीच्या २०० देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या कारवाई प्रकरणी पोकाॅ अमजद खान पठाण यांनी तक्रार दिल्यावरून खेमचंद भोई याच्याविरुद्ध जमावबंदीचे आदेश तोडून अवैद्य दारूची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Protected Content