जळगाव, प्रतिनिधी । मानव सेवा मंडळ जळगांव संचलित प्राथमिक विद्या मंदिर, जळगावतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘ माझे अक्षर सुंदर अक्षर’ या नविन उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.
सध्या संपूर्ण देशभर कोरोना या विषाणुच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून शासनाने लाॅकडाऊन केले आहे. शाळांना सुट्या आहेत. या अशा परिस्थितीत विद्यार्थी काय करतील हा प्रश्न आपणास पडतो. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा टीव्ही व मोबाईलवर जातो. म्हणून त्यांचे शिकण्याकडे दुर्लक्ष होऊ नये या भावनेने प्रेरित होऊन शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांच्या संकल्पनेतून, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाने उपक्रमशील शिक्षक सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम ‘माझे अक्षर, सुंदर अक्षर’ सुरू केला आहे. हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन सुरू करण्यात आला आहे. यात दररोज बेसिकपासून मुळाक्षरपर्यंतची ओळख दिली जाते. विद्यार्थी सूचनेनुसार वहीमध्ये अक्षराचा सराव करीत आहे. शैक्षणिक वाटचालीस नवचैतन्य व उभारी देणारा हा उपक्रम ठरणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी विशेष कौतुक केले आहे.