जळगाव, प्रतिनिधी । शहरात विविध बँकांमध्ये आज पेंशनधारकांनी पेंशन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी काही बँकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे दिसून आले. याबाबत काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा व जीवनाश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. यात बँकांचाही समावेश आहे. आज शहरातील विविध बँकांमध्ये पेंशन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यात रिंगरोडवर असलेली बँक ऑफ इंडियाच्या शाखेत देखील पेंशनधारक आले होते. मात्र, या ग्राहकांसाठी बँकेने कोणत्याही स्वरूपाचे सोशल डिस्टन्सचे पालन केले नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बँकेसमोर गर्दी झाल्याने परिसरातील जागरूक नागरिकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन वरून याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी बँक ऑफ इंडियाच्या रिगरोड शाखेत धाव घेतली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश देवरे व प्रशांत जाधव यांनी ग्राहकांना सोशल डिस्टन्स राखून बँकेत सोडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बँक प्रशासनाने पोलीस येण्यापूर्वीच ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी होती अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करत आहे.