मुंबई प्रतिनिधी । संघाची शैक्षणिक क्षेत्रातील घुसखोरी राज्य सरकार खपवून घेणार नसल्याचा इशारा आज महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापनविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटने पत्रकारीता विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या नोईंग आरएसएस या कार्यशाळेला उपस्थित राहावे अशी नोटीस बजावल्यानंतर खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यातच आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या कार्यशाळेला उपस्थित रहाण्याची नोटीस मिळाल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
यावरून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.