श्री संत मुक्ताई अंतर्धान सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा

मुक्ताईनगर , प्रतिनिधी  ।  श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा तापीतिरावरील  संत मुक्ताबाई  समाधीस्थळ कोथळी-मुक्ताईनगर येथे गुलालाचे कीर्तन व पुष्पवृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात आला. तसेच संत आदिशक्ती मुक्ताईचे तापीपूर्णा संगमावरील मेहुण येथील मुक्ताई मंदारीतही अंतर्धान सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला.

 

यावर्षी  कोरोना पार्श्वभूमीवर जुनी कोथळी येथे  मोजक्याच  २५ भाविकांच्या उपस्थितीत ह.भ.प.रविंद्र  महाराज  हरणे यांचे गुलालाचे कीर्तन झाले. तसेच पंढरपूर  येथील संत नामदेव महाराज पादुका, पंढरपूर येथील श्रीविठ्ठल पादुका, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ पादुका दिंडी व भाविकांना सलग दुसर्‍या वर्षी कोरोनामुळे या सोहळ्यात सहभागी होता आले नाही.  यंदा अगदी साध्या पद्धतीने नविन मंदिरात वरणगाव येथील अजाबराव पाटील  यांनी  सुरेख आब्यांची आरास केली. पहाटे  पूजा अभिषेक व  महाआरती  मुक्ताई संस्थानचे व्यवस्थापक विनायकराव हरणे  व सौ शीला हरणे यांच्या हस्ते पार पडली.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतले मुक्ताईचे दर्शन :  आईसाहेब मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त हभप रविंद्र  हरणे महाराज यांचे गुलालाचे कीर्तन सुरू असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी संत मुक्ताई समाधी स्थळ जुनी कोथळी येथे आईसाहेब मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, मंदिराचे  व्यवस्थापक ह  भ प उद्धव महाराज जुणारे, पुजारी विनायक व्यवहारे  यांची उपस्थिती होती .

 

श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांची मुक्ताई चरणी ऑनलाईन अब्जचंडी सेवा  :-

संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील हजारो  सेवेकऱ्यांनी ऑनलाईन अब्जचंडी सेवेत सहभाग घेऊन सप्तशती पारायण सोहळ्यात भाग घेतला.पारायणा दरम्यान सप्तशती च्या प्रत्येक अध्याय समाप्ती ला मुक्ताई अष्टक चे पारायण करण्यात आले, ही अब्जचंडी सेवा अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्ग दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या वतीने आज त्रिवेणी योगावर शुक्रवार, राहूकाळ व संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा दी.4/6/2021 वार शुक्रवार या दिवशी संपन्न झाली. या दिवशी सेवा मार्गच्या वतीने ऑनलाईन मुक्ताईचंडी सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन सेवेत हजारो सेवेकऱ्यानी सहभागी होऊन कोरोना महामारीचे उच्चाटन व्हावे म्हणून,आई मुक्ताई चरणी सेवा रुजू केली.सर्व सेवेकरी बंधु भगिनींनी घरी राहूनच सेवा केली.

 

Protected Content