श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील झाडाला आग (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरातील वडाच्या झाडाने दुपारी पेट घेतला होता. ही आग संध्याकाळी अग्निशमन दलाच्या बंबाने विझवली, सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्तीय हानी झाली नाही.

महापालिकेच्या मालकीच्या जिल्हा परिषद समोरील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरात वडाचे झाड आहे. मंदिरात या वडाच्या झाडा समोर लावलेल्या दिव्याने झाडाने पेट घेतला. हीबाब दुपारी चार वाजेच्या सुमारास नागरिकांच्या व उद्यानात असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी बदलीच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेल्याने अग्निशमन दलाच्या बंब बोलविण्यात आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.

‘त्या’ गाडी मालकामुळे अग्निशमन दलाच्या बंबास उद्यानात जाण्यास उशीर

अग्निशमन दलास जेव्हा श्यामाप्रसाद प्रसाद उद्यानातील आगी बाबत कळविण्यात आले असता त्यांचा एक बंब लागलीच घटनास्थळी दाखल झाला. मात्र, या बंबास उद्यानाच्या प्रवेशद्वार व परिसरात जातांना तेथे उभ्या असलेल्या गाड्यांनी अडचण निर्माण झाली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी एका चारचाकीच्या गाडी मालकास गाडी बाजूला करण्याची विनंती केली. मात्र, त्याने गाडी बाजूला न घेता अग्निशमन दलाच्या जवानांशी हुज्जत घातली. यात जवळपास १५-२० मिनिटांचा वेळ व्यर्थ गेला. वेळ व्यर्थ जात असल्याने अग्निशमन दलाची छोटी गाडीस पाचारण करण्यात आले. अखेर, अर्ध्या तासांनी झाडाला लागलेली आग विझविण्यात यश आले.

यांची झाली मदत
उद्यानात असलेले बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मनीष अमृतकर, मुकादम गोपी सपकाळे, कयुम शेख, नितीन माळी, अग्निशमन दलाचे प्रकाश कुमावत, देवीदास सुरवाडे, भगवान जाधव, प्रदीप धनगर, सोपान कोल्हे,  प्रल्हाद सोनवणे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

Protected Content