शेळगावमार्गे जळगाव ते यावल रस्त्याचा मार्ग मोकळा

जळगाव प्रतिनिधी । शेळगावमार्गे जळगाव ते यावल या रस्त्याच्या कामाचे उदघाटन अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे या मार्गाने होणार्‍या वाहतुकीला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आसोदा येथे यावल-शेळगांव-भादली-आसोदा या रस्त्याच्या मजबूतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार अमोल निकम, रावसाहेब पाटील, राजेंद्र चव्हाण, सरपंच नबाबाई बिर्‍हाडे, उपसरपंच अरुण कोळी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांनी केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विश्‍वनाथ पाटील यांनी आभार मानले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आसोदा ते यावल पर्यंत तयार होणार्‍या या रस्त्यामुळे तीन तालुके जुळणार आहेत. यासाठी ८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर रेल्वे उड्डाणपुलासाठी २२ कोटी रूपयेही मंजूर झाले आहेत. या दोन्ही कामांचा शुभारंभ लवकरच होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून साडेतीन वर्षांत ३६ जलसंधारण प्रकल्पांसह २२०० किलोमीटरपर्यंत हे काम केले आहे, हे कार्य खान्देशातही विस्तारणार असल्याचे सांगितले.

Add Comment

Protected Content