मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संकट देशाच्या सर्वच भागात आहे. केंद्र आणि राज्याने एकत्र बसून आर्थिक प्रश्नावर मार्ग काढण्याची नीती ठरवली पाहिजे. राज्यातील शेती व्यवसायावरही परिणाम झाला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज त्याची पर्नरचना केली पाहिजे. हफ्ते लांबवले पाहिजे, व्याजदरात सूट दिली पाहिजे. पीकदरातील व्याजदर शून्यावर आणला पाहिजे. त्यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहेत. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रांना पुरक आर्थिक निर्णय घेतले पाहिजेत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रासह देशात उद्भवलेली परिस्थिती व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. गेल्या ४० दिवसांपासून कारखाने, व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटींची तूट होईल असं दिसून येतं. म्हणजे एकूण महसूलाच्या ४० टक्के तूट राज्यात होणार आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना याबाबत पत्र पाठवून कल्पना दिली. ‘राज्यातील बाधितांचा आकडा वाढतोय हे खरे असले तरी नाउमेद होण्याचे कारण नाही. चाचण्या वाढल्यामुळे ही संख्या वाढल्याचे दिसत आहे. ही संख्याही नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय. पोलीस, आरोग्य यंत्रणा, मीडिया यांच्यासह राज्यातील जनताही त्यांना सहकार्य करते आहे,’ असेही शरद पवार म्हणाले.