पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना निपाणे परिसरातील शेतकरी बेकायदेशीररित्या पाईपलाईनसाठी खोदकाम करताना आढळून आले. यासंदर्भात जागृत नागरिकांनी पाईप लाईन खोदकाम बंद करून जवळच्या पोलीस औट पोस्टला धाव घेत साहित्य जप्त केले. परंतु संबंधित शेतकऱ्याविरुद्ध केवळ कारवाई न करता माफीनामा घेण्यात आला. त्यामुळे परिसरात नागरिकाकडून संताप व्यक्त केला जात असून भविष्यात अवैधरित्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्याविरुद्ध कारवाई न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील अग्नावती प्रकल्पातून नगरदेवळा गावास पाणीपुरवठा केला जातो, नगरदेवळा गावाची लोकसंख्या सुमारे ४० हजाराहून अधिक असून बऱ्याचदा या परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्यस्थितीत प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असून पिण्यासाठी आरक्षित आहे. असे असले तरी अग्नावती प्रकल्पातून निपाणे परीसरातील शेतकरी शेतीसिंचनासाठी जेसीबी यंत्राद्वारे जलवाहिनी खोदकाम करीत असल्याचे नगरदेवळा येथील शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व जागरूक नागरिकांना १० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आढळून आले. जागृत नागरिकांनी १० एप्रिल रोजी तेवढ्या रात्री संबंधित शेतकरी, पाईप भरलेले ट्रक्टरट्रोलीसह जेसीबी मशीन नगरदेवळा औट पोस्ट पोलीस ठाण्यात जमा केले.
यासंदर्भात पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या ग्रामस्थांमध्ये संताप पसरला असून संबंधित बेकायदेशीर पाइपलाइन करणाऱ्या शेतकरीला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करून जरब बसवावी जेणेकरून भविष्यात कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करणार नाही, तसेच गांवाला आठवड्यातून एकदाच पिण्याचे पाणी मिळते. त्यामुळे गावातील धरणाचे पाणी गावातील जनतेसाठीच राखीव राहिले पाहिजे असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता.
जलसंपदा विभागाकडे प्रकल्पातून पाणीचोरी करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई तरतूद नाही. तसेच धरणातील उपयुक्त पेयजल साठा वगळता जलसंपदा विभागाकडे अर्ज करून शेतकरी पाणी घेवू शकतात असे पत्रकारांना सांगत सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी शाखा अग्नावती प्रकल्प शाखा अभियंता के. बी. देशमुख यांनी नागरिकांची समजूत काढली आणि संबंधित शेतकऱ्याकडून लेखी माफीनामा घेत प्रकरण मिटवले. यावेळी शाखा अभियंत्यासमवेत कालवा निरीक्षक एन.जे पाटील उपस्थित होते.
अन्यथा महिलांना आंदोलन करावे लागेल
शाखा अभियंता देशमुख यांच्या या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला असून या माफीच्या धोरणामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामस्थांची प्रतिक्रिया-
मोठ्या लोकसंख्येच्या नगरदेवळा शहरातील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पूर्वीप्रमाणे पाण्यासाठी पायपीट करायची भीषण वेळ पुन्हा येऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन या अवैध पाईपलाईन प्रकरणी वेळीच योग्य ती कारवाई करावी,. अन्यथा महिलांना आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी युवती तालुका प्रमुख अभिलाषा रोकडे यांनी दिला आहे.