जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतकर्यांनी कृषी उत्पादनांवर प्रक्रियेकडे मोठ्या प्रमाणात वळावे, जेणेकरून त्यांना कृषी मालाचा मोबदला चांगला मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गट शेतीचा अवलंब करावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत आज समुदाय आधारीत शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले. शेती हा सर्वात मोठा दवाखाना असून यातून सर्वांना आरोग्य प्राप्त होत असते. आणि शेतकऱ्यांना शासकीय पातळीवरून सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज स्मार्ट योजनेच्या अंतर्गत समुदाय आधारित शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, आ.राजुमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे , आत्माचे उपप्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, यांच्यासह कृषी खात्याचे व नाबार्डचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी कंपन्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, केळी उत्पादकांना पुरेसा भाव मिळत नसतांना दुसरीकडे आपल्याच भागात ग्राहकांना आधीच्याच भावात केळी घ्यावी लागत आहे. यामुळे शेती मालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडे उत्पादीत होणार्या केळीपैकी फक्त चार-पाच टक्के केळीवरच प्रक्रिया करण्यात येते. हे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले की, अनेक शेतकरी तंत्रज्ञानाची कास पकडत असून यातून चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र अद्यापही अनेक शेतकरी यापासून दूर असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आगामी काळात पालकमंत्री म्हणून शासकीय पातळीवरील जी काही मदत करता येईल याचे आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. शेती ही फक्त शेती नसून खूप मोठा दवाखाना आहे. . .येथे गेलेल्याला कोणत्याही दुसर्या दवाखान्याची गरज पडत नाही असे पालकमंत्री म्हणाले. तसेच शेतकर्यांना योग्य प्रमाणात कर्ज भेटत नसल्याचे नमूद करत या प्रकरणी बँकांनी दृष्टीकोण बदलणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतकर्यांनी आता सौर उर्जेकडे वळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या लहान पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर सुरू करण्याचे आपण निर्देश दिल्याची माहिती सुध्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे , उत्पन्न व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी शानच्या योजनानाचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे तसेच केळी हे जिल्ह्याचे प्रीमिअम प्रोडक्ट असून केळी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी सकारत्मक भूमिका घ्यावी असे आवाहन केले .
कार्यक्रम सुरू होण्याआधी पालकमंत्र्यांनी सभागृहाच्या बाहेर शेतकर्यांनी लावलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली. यात केळीच्या भाकरींसह कृषीमालांवर प्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी याबाबतची माहिती जाणून घेतली. प्रारंभी कृषी खात्यातर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दलची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी ऍग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी आपल्या शेतातील उत्पादने मान्यवरांना भेट म्हणून दिले. तर त्यांनी आपल्या मनोगतातून जळगावात मार्च महिन्यात भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी विविध शेतकरी गटांना स्मार्ट योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्वक सूत्रसंचालन प्रकल्प विशेषज्ञ संजय पवार यांनी केले आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते पुस्तिका विमोचन संपन्न
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, पंकज आशिया व मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट प्रकल्प माहिती पुस्तिका , तणांचे औषधी गुणधर्म, PMFME घडी पत्रिका व केली काढणी पश्च्यात तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग घडी पत्रिकेचे विमोचन करून प्रकाशन करण्यात आले. या पुस्तीकांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
पिकेल ते विकेल योजनेतर्गत 18 शेतकरी कंपन्यांना 60 लाखाचे धनादेश वाटप
विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 2 वर्षांपासून सुरु करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत व्यापाऱ्यांशी झालेल्या करारानुसार जिल्ह्यातील 18 शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांना केळी. भेंडी, कापूस, मुग बिजोत्पादन , मका, मिरची , नागवेल पान, हळद, भरीताची वांगी , पपई, जिरेनियम ओला पाला व टरबूज अश्या विविध पिकांसाठी विकेल ते पिकेल योजनेतर्गत 60 लक्ष 17 हजार ३३३ रुपयांचे अनुदान ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामुळे विकेल ते पिकेल ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सांगितले की,शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकरी संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संघटना निर्माण करा. बांधावर बांबू लागवड करून शाश्वत उत्पनाचा स्रोत निर्माण करावा. एक पीक पद्धतीचा वापर न करता बहुपीक पद्धतीचा वापर करून नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तर आमदार राजुमामा भोळे शेतकरी यांनी आधुनिक शेती वर भर देऊन शेती बरोबर जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करावे. शेतकऱ्यांनी एकाच पिकाचे लागवड न करता विविध पीके शेतीमध्ये घेणे गरजेचे आहे. शेती विक्री नकरता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्पादन वाढीवर भर देण्याचे आवाहन केले.
ठळक बाबी
· पोखरा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण 460 गावांची निवड करण्यात आली असून आज रोजी आज पावेतो जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या 79 हजार 344 शेतकऱ्यांपैकी आज पावेतो 41 हजार 779 शेतकरी बांधवांना तब्बल रक्कम रुपये 257 कोटी 44 लक्ष इतका रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेला आहे.
· यात ठिबक सिंचन संच ,शेळी पालन , शेडनेट गृह ,शेततळे, पौलीहाउस, इलेक्ट्रिक मोटारपंप ,फळबाग व वनिका आधारित शेती,,पाईप , रेशीम उद्योग अश्या 22 प्रकारच्या बाबींवर 257 कोटी 43 लक्ष 27 हजार इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे. शासनाकडे 225 लाभार्थ्यांचे एक कोटी 66 लाख इतके अनुदान वितरण अंतिम टप्प्यात आहे.
· पोकरा अंतर्गत 26 हजार 637 शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे ठिबक, औजारे, शेड नेट अस्तरीकरणाचे सुमारे 25-30 कोटींचे प्रस्तावांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मंजूर केले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्व मंजुरी दिलेल्या वस्तू / बाबी खरेदी कराव्यात जेणे करून जेणे करून अनुदान टाकता येईल.
· सभागृहाच्या बाहेर शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली. यात केळीच्या भाकरींसह कृषीमालांवर प्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी याबाबतची माहिती जाणून घेतली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/704327990925329