नवी दिल्ली: वृत्तसंस्था । देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांची माहिती नाही. नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी हे केरळ येथील वायनाड मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. वास्तव हे आहे की देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांविषयीची माहिती नाही. या कायद्यातील तरतूदींची त्यांना माहिती नाही. त्यांना जर या कायद्याची माहिती झाली तर संपूर्ण देशात आंदोलन होईल. संपूर्ण देशाला आग लागेल, असं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी महात्मा गांधी यांचं एक वाक्य ट्विट करून कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. महात्मा गांधी म्हणाले होते, विनम्रपणे विरोध करून तुम्ही जग हादरवून सोडू शकता… माझी विनंती आहे की केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
देशातील आजची परिस्थिती तुम्ही जाणून आहात. केवळ २–३ बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. आज प्रत्येक उद्योगावर ३-४ उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.