नवी दिल्ली :: वृत्तसंस्था । ‘आंदोलन करणारे शेतकरी कोणाच्याही आहारी गेलेले नाहीत. विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या संघटनांना भडकविलेले नाही,’ असे सांगून क्रांतिकारी किसान युनियनचे नेते डॉ. दर्शनपालसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दावे फेटाळून लावले.
पीएम किसान सन्मान निधीचा एक हप्ता वाटण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा एवढा प्रचार करण्याची आज गरज नव्हती. देशातील सहा टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. सर्व पिकांना हमी भाव मिळेल, यासाठी सरकारने कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी दर्शनपाल सिंह यांनी केली.
‘पंतप्रधान मोदी आंदोलक शेतकऱ्यांशी थेट चर्चा का करीत नाहीत,’ असा सवाल लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी केला. केवळ २२ किलोमीटर दूर एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत लाखोंच्या संख्येने बसलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान कच्छ आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांपाशी जातात. सर्व काही ठीक आहे, तर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून खुलेपणाने चर्चा करा. आम्ही विरोधी पक्ष दिशाभूल करीत आहोत आणि तुम्ही सर्व काही योग्य करीत आहात, तर तुम्ही पळ का काढत आहात, असा सवाल चौधरी यांनी केला.