नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमेवर कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर हल्ला झालाय.
किसान सभेचे नेते राकेश टिकैत राजस्थानातील हरसौरा इथून सभेला संबोधित करुन बानसूरकडे निघाले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती टिकैत यांनी दिलीय. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहे. टिकैत यांच्यावर शाईही फेकण्यात आली. या हल्ल्या प्रकरणी अलवरच्या मस्त्य विद्यापीठातील छात्रसंघाचे अध्यक्ष कुलदीप यादवसह ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. सुरक्षाकडं बनवत पोलिसांनी टिकैत यांनी तिथून बाहेर काढलं आणि बानसूर इथं त्यांना सुरक्षित पोहोचवण्यात आलं. “राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ततारपूर चौराहा, बानसूर रोडवर भाजपच्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. लोकशाहीच्या हल्ल्याचं चित्र”, असं ट्वीट करत हल्ल्याची माहिती स्वत: टिकैत यांनी दिली आहे. टिकैत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक आणि गोळी चालवल्याचाही आरोप केलाय.
राकेश टिकैत यांच्यावर झालेल्या या हल्ल्याला किसान आंदोलनाच्या व्यासपीठावर भाजपला जबाबदार धरण्यात आलं. बानसूरच्या किसान सभेच्या व्यासपीठावरुन आम्ही ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’, असा इशारा देण्यात आला आहे. टिकैत यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आणि कारवाईची मागणी केली. शेतकरी नेत्यांनी भाजपवर हल्ल्याचा आरोप करत राजस्थानात भाजपची अवस्था हरियाणा आणि पंजाबसारखी करु, असा इशारा दिलाय.
राकेश टिकैत यांनी आज राजस्थानच्या अलवरमध्ये शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित केलं. राकेश टिकैत हे सध्या राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या सभा घेत आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जागृती करण्याची मोहीम शेतकरी नेत्यांनी हाती घेतली आहे.