शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण, ५०० जणांचे मृत्यू

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत . आतापर्यंत ५०० आंदोलकांचे मृत्यू झाले आहेत

 

नव्या कृषी कायद्यांविरोधात  सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नसल्याने शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. दुसरीकडे हे आंदोलन नेमकं कधीपर्यंत चालणार हेदेखील अस्पष्ट आहे. २६ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठवत आंदोनालास सुरुवात केली. ऊन, थंडी, कोरोना कशाचीही चिंता न करता आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

 

आपल्या मागण्यांसाठी लढणाऱ्या ५०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अद्यापही कायदा रद्द करण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. किसान एकता मोर्चाने ट्वीट करत लढा सुरु होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटोही शेअर केले आहेत. जोपर्यंत विजय होत नाही तोवर आम्ही आंदोलन करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

 

दरम्यान ट्विटरला #500DeathsAtFarmersProtest हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखीलल ट्विट केलं असून शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.  आपली शेती व देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरत आहेत. पण ते घाबरलेले नाहीत नाहीत आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

याआधी मे महिन्याच्या अखेरीस आंदोलनकर्त्या आणि दिल्लीच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सहा महिने झाल्यानिमित्त काळा दिवस पाळला होता.

 

Protected Content