शेतकरीविरोधी अध्यादेश तत्काळ रद्द करून मका खरेदी करा; लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधानांनी ३ जून रोजी काढलेले अध्यादेश शेतकरीविराेधी असून, ते तत्काळ रद्द करून हमीभाव द्यावा, या मागणीसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मका खरेदी सुरू करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत लाेकसंघर्ष माेर्चातर्फे साेमवारी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दोन स्वतंत्र निवेदन देण्यात अाले.

निवेदनात म्हटले अाहे की, पंतप्रधान यांनी ३ जून रोजी काढलेले अध्यादेश जे शेतकरीविरोधी आहेत. ते तत्काळ रद्द करण्याची व हमीभावाची मागणी केलेली आहे. दुसरे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचा मका तत्काळ खरेदी करावा. जिल्ह्यातील खतांचा काळाबाजार थांबवा, महाराष्ट्रातील सामुदायिक वनपट्टेधारकांना तत्काळ वनपट्टे मंजूर करावे. आदिवासींना तत्काळ खावटी अनुदान मंजूर करा, ज्या वनजमीनधारकांना पट्टे मंजूर झाले आहेत. पण त्यांना कुठलेही कर्ज मिळत नाही, अशा सर्व दावेधारकांना तत्काळ विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद बनवून घेत त्यांना कर्जवाटप करण्यात यावे, त्यांना मुख्य प्रवाहात आणावे. तेंदू व गौण वन उपजावर वन विभागाचा बेकायदेशीर हस्तक्षेप कमी करावा, महाराष्ट्रात ३५०० गावांना सामुदायिक वन अधिकार मिळाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास लोकसंघर्ष मोर्चा गावागावात अभिनव आंदोलन करेल व सरकारला जेरीस आणेल, असा इशारा दिला. या वेळी भरत कर्डिले, प्रमोद पाटील, सिद्धार्थ शिरसाट हजर होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व सचिन धांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनावर गावागावातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content