शेंदुर्णी प्रतिनिधी । येथे शेतकऱ्यांना ई-पिकपेरा नोंदणीस अडचणी येत असल्याने अशा शेतकऱ्यांना ऑनलाइन पीकपेरा प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा ५०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
७ / १२ वर ऑनलाइन पीकपेरा कसा लावावा याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. उदा .अॅप ओपन न होणे , पीकपेरा क्षेत्र 0000 येणे , चूक दुरुस्ती व अपलोड माहिती डिलीट होत नाही , अशा अनेक अडचणी येत आहे. आता नेमके काय करावे , पीकपेरा नही लावला तर पीकविमा मिळणार नाही म्हणून शेतकरी परेशान झालेले आहे. यावर उपाय व मार्गदर्शनासाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुभाष कुंभार व त्यांच्या टीमने परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करून शेंदुर्णी पारस मंगल कार्यालय येथे बोलावून त्यांच्या समस्या अडचणी समजून घेऊन त्याना माहिती व मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मोबाईलवर पीकपेरा लाऊन दाखविण्यात आला. या मोहिमेत सुमारे ५०० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. यावेळी जामनेर प. स. चे मंडळ कृषी अधिकारी नीता घाडगे, शेंदुर्णी सजाचे मंडळ अधिकारी हर्षल पाटील, वाकडी विभागचे सर्कल विष्णू पाटील, तलाठी एस. एम.नाईक यांनी कामकाज केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सर्व टीमचे आभार मानले.