शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे – संजय गरुड

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । – येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे या मागणीसाठी तालुका राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की शेंदुर्णी हे मोठे गाव असून येथील लोकसंख्या ४०००० आहे तसेच आसपासच्या पंधरा खेड्यांचे मिळून ३० हजार लोकसंख्या असे आरोग्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. सोबतच शाळा-कॉलेजेस मोठ्या सहकारी संस्था मोठे व्यापारी बाजारपेठ असून हजारोच्या संख्येने नागरिकांचे आवागमन सुरू असते. त्यामुळे प्राथमिक उपचार व्यतिरिक्त मोठे उपचार होऊ शकत नाही. येथून १५ किमी अंतरावर पहूर ग्रामीण रुग्णालय तर ५० किमी अंतरावर जिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे एखादा त्या अस्वस्थ रुग्णास सेवा मिळाल्याने वेळ प्रसंगी प्राणही गमवावा लागतो. लोकसंख्येच्या मानाने येथील आरोग्यसेवा अपूर्ण पडत आहे. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाकाठी चारशेच्या वर महिलांची प्रसुती होते. वेळप्रसंगी एखाद्या महिलेस प्रसूतीसाठी पहुर अथवा जळगाव येथे पाठवावे लागते. त्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच २०१० मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत चा ठराव देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने याचा विचार होऊन शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे असे निवेदनाद्वारे श्री संजय गरुड यांनी मागणी केली आहे.

या संदर्भात संजय गरूड म्हणाले की, मागील दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ची मागणी बघता मध्यंतरीच्या काळात युतीचे सरकार आले तालुक्याचे आमदार हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना देखील त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे नागरिकांच्या प्रश्‍नांबाबत संवेदनशील असून त्यासाठी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे याबाबत मागणी केली असता त्यांनी योग्य ती माहिती घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

Protected Content