शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील शिवदत्त नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना मोठ्या अडचणीत सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
येथील शिवदत्त नगर मधील रहिवाशी नगरपंचायतचे सर्व कर नियमित व वेळेवर भरणा करतात ,तरीही कोणत्याच प्रकारची मूलभूत सुविधा या भागात पुरवली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या भागात रस्ते, गटारी, विद्युत पथदिवे इत्यादी सुविधा नाहीत. या पूर्वी देखील या भागातील रहिवाश्यांनी स्वतः पैसे जमा करून रस्तावर दगड, मुरूम टाकून स्वतःचा रस्ता स्वतःच तयार केला आह. तसेच आता या रस्त्यावर खड्डे पडले असतांना साधा मुरूम टाकण्याची देखील तसदी नगर पंचायतने घेतली नाही.
शेंदूर्णी नगरपंचायतच्या अनास्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहे. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने शिवदत्त नगर रहिवाशी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. येथे अलीकडेच झालेल्या थोड्याफार पावसामुळे गट क्र ६०६/१ मधील शिवदत्त नगरच्या मागच्या बाजूला व निसर्ग हॉटेलच्या मागील बाजूस पाणी साचले होते. हे पाणी पुढे वाहून जाण्यासाठी चक्क शिवदत्त नगरचा एकमेव असलेला मुख्य रस्ताच मागील आठ दिवसापासून खोदून टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दररोज खोदलेल्या चारीतून मार्गक्रमण करत घर गाठावे लागत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर चारी खोदतांना पाणीपुरवठ्याची पाईप लाईन सुद्धा तोडली गेली असल्याने आठ दिवसापासून पाण्यावाचूनही नागरिकांचे हाल होत आहेत. परंतु नगरपंचायत किंवा स्थानिक नगरसेवकांना सदर रहिवाश्यांच्या समस्या गांभीर्याने घेणे गरजेचे वाटत नाही. त्याविषयी नगरपंचायत मध्ये निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने येथील नागरिक हतबल झाले आहेत. नगरपंचायत प्रशासन किंवा स्थानिक नगरसेवक यांनी या समस्याकडे साधे ढुंकुनही पाहिले नसल्याबद्दल येथिल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.