शेंदुर्णी, ता. जामनेर विलास पाटील । जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा रूग्ण आढळून आले असतांना एकमेव शेंदुर्णी नगरपंचायतीच्या हद्दीत मात्र अद्याप कोरोनाचा संसर्ग आढळून आलेला नसल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगरपालिका, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, वरणगाव, बोदवड, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा,भडगाव, चाळीसगाव, पाचोरा व जामनेर या महानगरपालिका/ नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत. तथापि, जिल्ह्यात एकमेव शेंदूर्णी नगरपंचायत क्षेत्रात कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला नाही याबद्दल नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.या बाबतीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोन वेळा १००% पाळलेला लॉक डाउन त्याच बरोबर नागरिकांची जागरूकता या शिवाय नगरपंचायत, पोलीस, व प्राथमिक रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांची सतर्कता कारणीभूत आहे. यापुढेही नगरपंचायत, पोलीस प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दिल्या जाणार्या सूचनांचे तंतोतंत पालन करून जनतेने सहकार्य केल्यास शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीत कोरोनाला कायमस्वरूपी नो एन्ट्री करता येईल असे तिन्ही प्रशासनाचे वतीने सांगितले जात आहे.
शहरातील बहुतांश नागरिक मात्र आजच्या परिस्थितीत खान्देशचे प्रतिपंढरपूरची शेंदूर्णी येथिल ग्रामदेवता श्री त्रिविक्रम भगवान यांचा आशीर्वाद गावाला कोरोना संकटापासून दूर ठेवत असल्याची श्रद्धा बाळगून आहे.राज्यात व देशात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढला असून समूह संक्रमण सुरू झाल्यामुळे राज्यात व देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या राज्यातील ईतर जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येच्या कितीतरी पटीने अधिक असल्याने तसेच संसर्गजन्य रुग्णांचा मृत्युदर देशात सर्वात जास्त असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष जळगांव जिल्ह्याकडे लागले आहे. यातही शेंदुर्णी येथे अद्याप रूग्ण आढळून न आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.