सांगोला प्रतिनिधी | शिवसैनिकांसाठी पोलीस केस म्हणजे मोठी बाब नाही. सध्या ईडीसह अन्य यंत्रणांचा गैरवापर होत असला तरी शिवसैनिक ईडीला घाबरत नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
शिवसेनेचे सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले की, भाजपने निवडणुकीनंतर दगाबाजी केली आणि दोन महिने आघाडीच्या आमदारांची हे हॉटेल ते हॉटेल अशी फिरस्ती चालू होती. यातच पहाटेचा शपथविधी झाल्याने सगळेच चिंतेत असताना शरद पवार यांनी आपले ब्रम्हास्त्र काढले आणि आज मेरे गाडीने बैठं जा म्हणत पुन्हा सगळे गोळा केले आणि अखेर हे सरकार बनले. आता ५० हजार सापडले आली ईडी असे झालंय. ही ईडी म्हणजे आपल्या जिल्ह्यातील एलसीबी पोलीस आहे, असा टोला लगावला. शिवसेनेला जेलचे काय नावीन्य, शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल असे सांगत आम्ही ईडीला घाबरत नसल्याचा टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी टीका करण्यापूर्वी कधी कापसाची बोन्डे, ऊस, कपाशी, केळी कधी पाहिली का? असा सवाल देखील त्यांनी केला.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसेन्स लागते हे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केलं तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सोडल्याचा टोला देखील ना. गुलाबराव पाटील यांनी मारला.