धरणगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असतांना अनेक कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेऊन शिवसेनेने जिल्ह्यातील गरजूंना मदतीचा हात दिला आहे. या माध्यमातून शिवसेना व साई सेवा संस्थेच्या मदतीने जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असून आज पाळधी येथे या उपक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे शिवसेनेची शिदोरी गरजू व गरिबांकडे पोहचण्यास मदत होणार आहे.
सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याने अनेक कुटुंबांना पोटाची खळगी नेमकी कशी भरावी हा प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमिवर, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गरजूंना मदतीचा हात दिला आहे. जिल्हाभरातील गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणारे किट वाटप करण्यात येत आहे. या किटमध्ये धान्यासह किराणा वस्तूंचा समावेश असून साधारणपणे एका कुटुंबाची सुमारे १५ दिवसांपर्यंत गुजराण होईल अशा प्रकारे यात वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
आज पाळधी येथे या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्यांदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि नंतर पूर्ण जिल्ह्यात ही मदत प्रदान करण्यात येणार असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, साई संस्थानचे अध्यक्ष सुनिल झंवर,जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, नंदलाल।पाटील,तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील सर.,सरपंच प्रकाश पाटील, अरुण पाटील, उपसरपंच अनिल कासट, चंदन कळमकर, समाधान चिंचोरे,लाला झंवर, चंदू माळी, किशोर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, लॉकडाऊन तिसर्यांदा वाढल्याने अनेकांना घरात खाण्यासाठी काहीही नसल्याचे आज दिसून येत आहे. याची दखल घेत समाजातील वंचितांसाठी शिवसेनेतर्फे येत्या काही दिवसांमध्ये जिल्हाभरात या प्रकारची मदत करण्यात येणार असून जिल्ह्यात कुणाचीही उपासमार होऊ देणार नसल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
या उपक्रमासाठी मदत करणारे पाळधी येथील साई देवस्थान आणि याचे प्रमुख सुनील झवर व त्यांच्या सहकार्यांचेही त्यांनी कौतुक केले. तर शिवसेना पक्ष हा नेहमीच वंचितांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.