शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील शिवभोजन योजनेतील भोजनालयांचा इष्टांक दुप्पटीने वाढविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार इच्छुक असलेल्या महिला बचत गट, भोजनालय चालक, खानावळ चालक, हॉटेल चालक, रेस्टॉरंट चालक, अशासकीय संस्था, महिला गृहउद्योग संस्थांनी 29 फेब्रुवारी, 2020 पर्यंत जिल्हा पुरवठाअधिकारी, जळगाव यांचेकडे अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

 

जळगाव शहरात, गरीब व गरजू जनतेच्या सेवेसाठी वर्दळीच्या ठिकाणे असलेल्या नविन बस स्थानक, रुग्णालये, जुने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी शिवभोजन योजनेतंर्गत अर्ज करणाऱ्या महिला बचत गट, भोजनालय, खानावळ, हॉटेल रेस्टॉरंट, अशासकीय संस्था, महीला गृहउद्योग संस्था इत्यादींना भोजनालयाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थीतीत सुरु असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी भोजनालयात एकाचवेळी किमान 25 व्यक्ती भोजन करु शकतील एवढी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. शिवभोजनालयासाठी संबंधित व्यक्ती अथवा संस्थांची जागा स्वमालकीची अथवा भाडे तत्वावर असलेबाबतचा स्पष्ट उल्लेख करुन जागा किती स्वेअर फुटाची आहे याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक राहील. संबंधित अर्जदाराची शिवभोजनालय चालक म्हणून निवड झाल्यावर शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत होणा-या अटी व शर्तीचे पालन करणे त्यांचेवर बंधनकारक राहील. इच्छूक अर्जदारांनी अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. असे जिल्हाधिकारी, जळगाव तथा अध्यक्ष, शिवभोजन योजना डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content