जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन क्रीडा विभागकडून कळविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या अनुषांगाने सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील फेडरेशन कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाउनलोड करून घ्यावा. व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत ३१ मार्च पर्यंत जमा करण्याचे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.